टर्म इन्शुरन्स हा आयुर्विम्यातील एक प्रमुख विमा प्रकार आहे. आयुर्विम्याची जी मूळ संकल्पना आहे व आयुर्विम्यातून ज्या प्रकारचे विमाकवच अपेक्षित असते ते उद्दिष्ट टर्म इन्शुरन्समधून साध्य होते.
टर्म इन्शुरन्स हा आयुर्विम्यातील एक प्रमुख विमा प्रकार आहे. आयुर्विम्याची जी मूळ संकल्पना आहे व आयुर्विम्यातून ज्या प्रकारचे विमाकवच अपेक्षित असते ते उद्दिष्ट टर्म इन्शुरन्समधून साध्य होते. कमी रकमेच्या हप्त्याच्या बदल्यात भरघोस विमाकवच हे या विम्याचे वैशिष्ट्य आहे. टर्म इन्शुरन्ससंबंधी महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे
यातून (मनी बॅक, एण्डोव्हमेंट वा अन्य पॉलिसींप्रमाणे) आर्थिक परतावा मिळत नसल्याने या विम्याकडे अनेक जण पाठ फिरवतात. विम्याकडे गुंतवणुकीचे नव्हे तर कौटुंबिक सुरक्षेचे साधन म्हणून बघितले गेल्यास या विम्याचे महत्त्व पटते. विमा कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना या विम्याची रक्कम मिळते. मात्र, विमा कालावधीनंतर विमाधारक हयात असल्यास विमा कंपनीकडून कोणत्याही स्वरूपात परतावा मिळत नाही. यामुळेच या विम्याला प्राधान्य दिले जात नाही. मात्र कार, घर आदींच्या विम्याच्या बाबतीतही असे घडू शकते हे लक्षात घ्यायला पाहिजे. या वस्तूंचा विमा काढल्यानंतर सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्यास विमा हप्त्याची रक्कम वायाच जाते. अर्थात, हप्त्याची रक्कम अशाप्रकारे वाया जाणे हे एका अर्थी चांगलेच असते. त्यामुळे टर्म इन्शुरन्सच्या बाबतीतही असा सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.
कमी रकमेत मोठे विमाकवचटर्म इन्शुरन्समधून अन्य आर्थिक परतावा मिळत नसल्याने यातून मिळणारे विमाकवच हे अन्य विमा पॉलिसींच्या तुलनेत कितीतरी अधिक असते. ३० वर्षांच्या तरुणाला एक कोटी रुपयांचा आयुर्विमा साधारण सात-आठ हजार रुपयांच्या (प्रत्येक कंपनीनुसार ही रक्कम कमीअधिक असू शकते) वार्षिक प्रीमियममध्ये मिळू शकतो.
ज्यांच्यावर पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे अशा कमावत्या पुरुषाने अथवा महिलेने अनिश्चिततेचा विचार करून एक कोटी रुपयांचा विमा काढणे ही काळाची गरज आहे. ही गरज केवळ याच प्रकारच्या विम्यातून पूर्ण होऊ शकते.
एक कोटीच का?
कुटुंबातील कमावत्या व्यक्तीने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १५ ते २० पट रकमेचा विमा काढणे आवश्यक असते. काही दुर्घटना घडल्यास या व्यक्तीच्या पश्चात उर्वरित कुटुंबाची आबाळ होऊ नये व त्यांच्या राहणीमानातही फरक पडू नये या उद्देशाने एवढे विमाकवच अपेक्षित असते. हे विमाकवच कमीतकमी मोबदल्यात मिळण्याचे एकमेव साधन म्हणजे टर्म इन्शुरन्स.
समजण्यास सुलभ
एण्डोव्हमेंट वा अन्य पॉलिसींमध्ये विमाकवच व बचत असा दुहेरी हेतू असतो. त्यामुळे काहीवेळा त्या पॉलिसी समजण्यास किचकट ठरू शकतात. टर्म इन्शुरन्समध्ये विमाकवच व विमा कालावधी एवढ्याच मर्यादित गोष्टी असल्याने निर्णय घेणे सोपे ठरते.
वैविध्य व नावीन्य
सद्यस्थितीत आघाडीच्या सर्व कंपन्यांकडून टर्म इन्शुरन्सची विक्री होते. या कंपन्यांच्या पॉलिसीजची नावे व वैशिष्ट्ये वरकरणी वेगळी वाटत असली तरी त्यात फार फरक नसतो. तरीही या कंपन्यांतील स्पर्धेमुळे आपल्या गरजेनुसार व आर्थिक क्षमतेनुसार त्यांतील योग्य पॉलिसी आपण निवडू शकतो.
आता सर्व आयुर्विमा कंपन्या या इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (इर्डा) अधिपत्याखाली असल्याने अमूक एक कंपनी श्रेष्ठ व अन्य कंपन्या दुय्यम असे काही उरले नाही हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.